राज्यात राबवणार स्वावलंबी देशी कापसाच्या शेतीचा ‘आवळगाव पॅटर्न’- किशोर
तिवारी
मारेगाव तालुक्यातील
आदिवासीबहुल आवळगाव परिसरातील जमीन हलक्या ते मध्यम स्वरुपाची असून कापूस पिकाची
लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कापसाच्या बीटी वाणांचा वापर, अनिश्चित
पाऊसमान, कोरडवाहू क्षेत्राचे अधिक्य, सुमार आर्थिक परिस्थिती व कृषि
निविष्ठाकरिता बाजारावरील अवलंबित्व या कारणामुळे उत्पादनखर्चात भरमसाठ वाढ होत
असल्याचे दिसून येते व उत्पादकता कमी असल्यामुळे निव्व्वळ नफा कमी होत आहे.
परिणामी मागास आदिम जमातीतील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावत आहे.या
अनुषंगाने १८ जुन रोजी मौजे आवळगाव येथे देशी कापूस वाणाचे अतिघानता लागवड
या करिता देशी वाणाचे बियाणे वाटप कार्यक्रम तालुका कृषि अधिकारी मारेगाव मार्फत आयोजित
करण्यात आले.
मा. श्री.किशोर तिवारी, अध्यक्ष
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय कापूस
संशोधन केंद्र नागपूर यांच्या ‘देशी कापूस वाणाचे अतिघनता लागवड’ या
तंत्रज्ञानावर आधारित बिजोत्पादन प्रात्यक्षिके डॉ.गोपाल ठाकरे, सहाय्यक
प्राध्यापक, कृषि विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्या समन्वयाने तालुका कृषि अधिकारी, मारेगाव
मार्फत १३० आदिवासी शेतकऱ्यांचे शेतात एक एकर क्षेत्रात प्रात्यक्षिकांचे आयोजन
करण्यात येणार आहे.महाबीजकडे देशी बिगर बीटी कापूस पिकाचे बिजोत्पादनासाठी नोंदणी
करण्यात येणार असून उत्पादित बियाणे बाजारभावापेक्षा ४००रुपये जास्त दराने
शेतकऱ्याकडून घेणार असल्याचे श्री. देशमुख व्यवस्थापक, महाबीज, यवतमाळ यांनी
आपल्या भाषणात सांगितले. सदर कार्यक्रम अंतर्गत वाटप केलेल्या 4 क्विंटल
बियाण्यापासून ४०० क्विंटल बियाणे उत्पादित करण्याचा संकल्प राज्यात प्रथमच या
भागातील आदिवासी शेतकऱ्यांनी केला आहे.
आवळगाव येथे आयोजित बियाणे
वाटप कार्यक्रमात शेतकऱ्यांना श्री. किशोर तिवारी यांच्याहस्ते कापूस देशी वाणाचे
बियाणे तसेच तूर व मुग पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात बोलताना
श्री.किशोर तिवारी म्हणाले कि, शेतकऱ्यांनी त्यांना वितरीत करण्यात आलेल्या देशी कापूस
वाणाचे तसेच कडधान्य पिकाचे बियाणे स्वत: उत्पादित करून गावातच बियाणे बॅंकतयार
करावे असे सांगितले. तसेच स्वावलंबी व पारंपारिक शेतीचा आवळगाव पॅटर्न राज्यभर
राबवणार असल्याचे मनोदय व्यक्त केला आणि बाजारावरील अवलंबित्व कमी करून विषमुक्त
शेती करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
श्री दत्तात्रय गायकवाड
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यवतमाळ यांनी कमी खर्चाची शेती व मुलास्थानी जलसंधारण
उपाययोजनेचा अवलंब करून शाश्वत शेतीचा विकास साधावा असे सांगितले.तसेच या
कार्यक्रमाविषयी शेतकऱ्यांचा उत्साह बघून समाधान व्यक्त केले. डॉ.सी.यु.पाटील
सहयोगी संशोधन संचालक, विभागीय संशोधन केंद्र यवतमाळ यांनी देशी वाणाचे अति घनता
कापूस लागवड व खरीप पिकाचे लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
श्री राहुल सातपुते, उपविभागीय कृषि अधिकारी, पांढरकवडा यांनी केले.सूत्रसंचालन
श्री.राकेश दासरवार तालुका कृषि अधिकारी, मारेगाव यांनी केले. या कार्यक्रमास
श्री.जे.आर.राठोड, कृषि विकास अधिकारी, यवतमाळ, श्री.शिवानंद मिश्रा, उपविभागीय
अधिकारी, वणी, श्री.विजय साळवे,तहसीलदार, मारेगाव. सरपंच श्री.तुळशीराम कुमरे, नानाजी
परचाके, अध्यक्ष, स.व.स. आवळगाव व परिसरातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment