बळीराजा अभियानाचा गरजू शेतकऱ्यांना फायदा व्हावा-किशोर तिवारी
*बीपीएलचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार
*पिक कर्जाच्या पुनर्गठणासाठी बँकांशी समन्वय
*सायखेडा धरणातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घ्यावा
यवतमाळ, दि. 17 : शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना मदत होणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राम समितीला या अभियानांतर्गत आलेला निधी गरजूंपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले. ते आज वागदा (ता. केळापूर) येथील शेतकऱ्यांच्या जनसुनावणीच्या वेळी बोलत होते.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री. सातपुते, गटविकास अधिकारी श्री. घसाळकर, वागदाच्या सरपंच रेशमा राठोड, विलास राठोड, राजू राठोड आदी उपस्थित होते.
श्री. तिवारी म्हणाले, शेतकऱ्यांनी सिंचनाची कास धरल्याशिवाय त्यांचा विकास शक्य नाही. त्यासाठी शासनाच्या विहिरींच्या योजनेतून गावात दिलेल्या विहिरी पूर्ण करण्यासाठी ग्रामसमितीने पुढाकार घ्यावा. त्यासोबतच गावातील नागरीकांचया असलेल्या शेतीमध्ये जाण्यासाठी पांदण रस्त्याची सुविधा तातडीने करून द्यावी. तसेच पाण्याची पातळी वाढावी, यासाठी शोषखड्डे घेऊन त्यात पावसाचे पाणी मुरविण्यासाठी प्रयत्न करावा. जिल्ह्यात सर्वत्र धरण, नदीमधील गाळ काढण्याचा उपक्रम लोकसहभागातून सुरू आहे. त्यामुळे वागदाच्या लगत असलेल्या सायखेडा धरणातून गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात यावा. शासन त्यासाठी डिझेल, जेसीबीचा खर्च देण्यास तयार आहे. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची व्यवस्था करून शेतात हा सुपिक गाळ टाकावा.
शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न आहे. याबाबत शासनाचे काय धोरण असेल यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी अवलंबून राहणार आहे. मात्र यावर्षी शेत पिककर्जाचे पुनर्गठण करण्यात येत आहे. यात थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलण्यात येतील. गावातील दारिद्रय रेषेखालील सर्वेक्ष्ण हे 15 वर्षापूर्वी झाले आहे. यात आता मोठे बदल झाले असल्याने याचे नव्याने सर्वेक्षण होणे गरजचेचे आहे. हा प्रश्न येत्या काही दिवसांत निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
यावर्षी पाऊस समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबिन या पारंपरिक पिकांकडे न जाता तूर किंवा इतर कडधान्याची लागवड केल्यास त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. त्यासोबतच स्किल इंडिया आणि मुद्रा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. याचा फायदा घेऊन शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीकोनातूनही प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शेतकरी आत्महत्यांची जबाबदारी ठरविणार
शेतकऱ्यांसाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र क्षेत्रियस्तरावरील कर्मचारी काम करीत नसल्याने या योजना त्यांच्यापर्यंत पोचविण्यात येत नाही. त्यामुळे ज्या गावात आत्महत्या झाली, त्या गावातील क्षेत्रिय कर्मचाऱ्यांवर या आत्महत्येची जबाबदारी ठरविण्यात येणार आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हयगय केलेली आढळल्यास त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यासाठी शासन गांभिर्याने विचार करीत असल्याचे श्री. तिवारी यांनी सांगितले.
विविध कामांचा आढावा
यावेळी श्री. तिवारी यांनी पिककर्ज, कर्जाचे पुनर्गठन, नापिकी, रोजगार हमी योजना, अन्न सुरक्षा, आरोग्यविषयक बाबी, शेततळे, तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा आढावा घेतला.
==========================================================
No comments:
Post a Comment